Pardhi and Kabutar Marathi story | पारधी व कबूतर मराठी गोष्ट

एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते.

त्या झाडावर लघुपतनक नावाचा कावळा रहात होता. एकदा खाण्यसाठी काही मिळते का हे बघण्यसाठी लघुपतनक गावाकडे उडत जात होता. एवढ्यात त्याच्या नजरेस काळाकभिन्न पारधी जाळे घेऊन जात असलेला दिसला.

ते बघून कावळ्याला वाटले, ”हा दुष्ट पारधी वडाच्या झाडाकडेच चालला असणार. म्हणजे आपल्या पक्षी बांधवांवर कदाचित संकट येणार तर….! कावळा तसाच वडाच्या झाडावर परत आला. आणि सर्व पक्षांना म्हणाला, ” हा दुष्ट पारधी धान्य टाकून तुम्हाला जाळ्यात अडकवण्यास येत आहे. तुम्ही धान्य खाण्याच्या मोहाने जर गेलात तर त्या जाळ्यात अडकाल!”

पारधी थोड्यावेळातच त्या झाडाजवळ आला आणि जाळं टाकून बाजूला बसला.

तेवढ्यात चित्रगीव नावाचा कबूतरांचा राजा आपल्या परिवारासमवेत अन्नाच्या शोधासाठी आकाशातून उडत होता. त्याच्या नजरेस पारध्याने टाकलेले धान्य दिसले. तेव्हा लघुपतनक त्या चित्रग्रीवाला ‘नको नको’ म्हणत असतानाही चित्रग्रीव आणि कुटुंबीय त्या धान्यावर तटून पडले. खरं म्हणजे चित्रग्रीव स्वत: ‍अतिशय हुशार आणि चाणाक्ष पण चित्रग्रवीच्या नशिबातच संकट असल्यास त्याला तो तरी काय करणार?

चित्रग्रीव आपल्या कुटुंबीयांसकट त्या जाळ्यात अडकला. बरीच कबुतरे जाळ्यात अडकल्याचे बघून पारधी खूष झाला. त्या कबुतरांना मारण्यासाठी पारधी काठी घेऊन धावत आला. त्या बरोबर चित्रग्रीवाने सर्व कबुतरांना जोर करून जाळ्यासकट उडण्याचा आदेश दिला.
त्याबरोबर जाळ्यासकट कबुतरांनी आसमंत गाठला. पारधी त्यांचा पाठलाग करू लागला, तशी कबुतरे वेगाने उडू लागली. शेवटी पारधी स्वत:च्या नशिबाला दोष देत मागे फिरला.

पारध्याच्या संकटातून पार पडल्याचे लक्षात येताच चित्रग्रीव म्हणाला, ”हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे. आपल्याला मोकळं करण्यासाठी त्याची मदत होईल.”

हिरण्यक एका टेकडीच्या बिळात रहात होता. तिकडे पोहोचल्यावर चित्रग्रवाने हिरण्यकाला मदतीची हाक दिली. त्याबरोबर हिरण्यक धावत आला. चित्रग्रीवाने घडलेली हकीगत सांगून जाळ्याचे पाश तोडण्याची विनंती केली. हिरण्यकाने मित्रप्रेमखातर आणि संकटात सापडलेल्यास मदत करण्याच्या वृत्तीने चित्रग्रीवास मोकळा करू लागला. तेव्हा चित्रग्रीवाने हिरण्यकास सांगितले की, ”आधी माझ्या परिवारचे पाश तोड. आपल्या प्रजेला संकटात ठेवून राजाने सर्वांच्या आधी संकटमुक्त होणे योग्य ठरणार नाही. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे कृती कर.”

हिरण्यकाला चित्रग्रीवाचे विचार ऐकून खूप आनंद झाला. हिरण्यकाने चित्रग्रीवाच्या परिवाराला आधी मोकळे केले आणि नंतर चित्रग्रीवास मोकळे केले. चित्रग्रीवाने हिरण्यकाचे आभार मानले असता, हिरण्यक उद्गारतो, ”कधी संकट आले तर मला जरूर हाक मार. मी मदतीला धावून येईन.”

तात्पर्य: संकटसमयी जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment